DNS म्हणजे काय? | What is DNS?

·

·

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

dns mhanje kaay

सध्या जी पण डिवाइसेस इंटेरनेटशी कनेक्ट होत असतात त्यांना त्यांच्या इंटरनेट पुरवण्याऱ्या कंपनीच्या सर्वरच्या माध्यमातून एक क्रमांक मिळतो ज्याला आयपी अॅड्रेस असं म्हणतात. 

हा अॅड्रेस तुमच्या जागेनुसार बदलत राहतो. जसं मी जर माझं जिओचं इंटरनेट चालू केलं तर त्यानुसार माझी लोकेशन नागपूरची दाखवतं आणि आयपी अॅड्रेस ११९ ने सुरू होतो. आणि घरच्या वायफाय ला कनेक्ट केलं तर आयपी अॅड्रेस १०६ ने सुरू होतो आणि याच्या आधारे माझी लोकेशन पुण्याची दाखवतं. 

याप्रकारे आपल्याला हा असा आयपी अॅड्रेस मिळतो. तर असाच प्रत्येक वेबसाइटला त्यांच्या सर्वर नुसार एक आयपी अॅड्रेस मिळतो. जसं माझ्या या वेबसाइटचा आयपी अॅड्रेस हा १७२ ने सुरू होतो असाच हा आयपी अॅड्रेस प्रत्येक वेबसाइटला मिळालेला असतो. 

DNS म्हणजे काय?

याचा फूल फॉर्म डोमेन नेम सिस्टम असा आहे. DNS हे संपूर्ण इंटेरनेटसाठी कॉन्टॅक्ट्स सारखंच आहे. जसं तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट्स मध्ये जाऊन त्याचं नाव टाकून त्याचा नंबर मिळवू शकता. आणि त्याच्याशी बोलण्यासाठी तो नंबर डायल करावा लागेल. तसंच अगदी वेबसाइट आणि ब्राऊजर मध्ये होतं. जसं, जर तुम्ही cyberbandhu.in असं सर्च केलं तर ब्राऊजर DNSच्या मदतीने या वेबसाइटशी निगडीत आयपी अॅड्रेस हुडकेल आणि मग तुम्हाला ती वेबसाइट दाखवेल. ब्राऊजर्सना हे आयपी अॅड्रेसच कळत असतात. वेबसाइटची नावे तर आपल्या सोयीसाठी आहेत. 

प्रामुख्याने जर तुम्ही स्वतः काही बदल केला नसेल तर तुम्ही तुमच्या इंटरनेट पुरवणाऱ्या कंपनीचा DNS वापरत असता. जसं जिओचं किंवा वायफाय कंपनीचं. यांच्या DNS च्या मदतीनेच मग ब्राऊजर आयपी अॅड्रेस मिळवतात आणि पुढचा कार्यक्रम करतात. 

एक उदाहरण देतो – २०२० मध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती आणि नंतर काही काळाने पबजी वर पण बंदी घालण्यात आली होती. अशात काही काळासाठी एयरटेल वर पबजी चालत होता याचं कारण एयरटेल ने त्यांच्या DNS सर्वर मध्ये पबजी ला ब्लॉक केलं नव्हतं. आणि काही जण क्लाऊडफ्लेअर कंपनीचं 1.1.1.1 हे DNS वापरुन पण पबजी खेळत होते. म्हणजे काही ब्लॉक केलेल्या वेबसाइट पण तुम्ही DNS बदलून वापरू शकता. 

DNS कॅशिंग

DNS कॅशिंग मध्ये तुम्ही नुकतीच भेट दिलेल्या वेबसाइटचा आयपी अॅड्रेस तुमच्या ब्राऊजर मध्ये किंवा डिवाइसमध्ये सेव्ह केला जातो. अशाने दर वेळेस नवीन रिक्वेस्ट सर्वरला पाठवली जात नाही आणि मग तुम्ही जलदरित्या परत त्या वेबसाइट ला भेट देऊ शकता. 

ब्राऊजर DNS कॅशिंग= या प्रकारात तुम्ही नुकतीच भेट दिलेल्या वेबसाइटचा आयपी अॅड्रेस तुमच्या ब्राऊजरमध्ये (क्रोम, फायरफॉक्स, सफारी, मायक्रोसॉफ्ट एज) सेव्ह केला जातो. 

ऑपरेटिंग सिस्टम लेवल कॅशिंग- या प्रकारात तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम (लिनक्स, विंडोज, अँन्ड्रॉईड, मॅक ओएस, आयओएस) मध्येच त्यांचे आयपी अॅड्रेस सेव्ह केले जातात. 

DNS काम कसं करतं?

एक उदहरणाच्या मदतीने सांगतो की DNS काम कसं करतं. जर तुम्हाला alaukikmarathi.com या वेबसाइटला भेट द्यायचं असेल तर ब्राऊजरला त्याचा आयपी अॅड्रेस हुडकावा लागतो. यासाठी तुमचा डिवाइस ब्राऊजरच्या मदतीने DNS ला एक विनंती पाठवतो की या alaukikmarathi.com चा आयपी अॅड्रेस मला सांग. 

ही विनंती recursive DNS सर्वर किंवा recursive resolver कडे विचारली जाते. मग ज्या पण सर्वर कडे या alaukikmarathi.com ची आयपी अॅड्रेस असेल त्याला authoritative name सर्वर असं म्हटलं जातं. 

dns काम कसं करतं

पहिल्या DNS च्या विनंती नंतर हे सर्च रूट सर्वरकडे जातं. या रूट सर्वर कडे टॉप लेवल डोमेन ची माहिती असते. हे टॉप लेवल डोमेन म्हणजे वेबसाइटचा शेवटचा भाग जसं .com, .in, .org इत्यादी. वेगवेगळ्या देशासाठी काही वेबसाइट वेगवेगळ्या टॉप लेवल डोमेन चा वापर करतात. जसं भारतासाठी .in किंवा .co.in चा वापर केला जातो. हे रूट सर्वर पूर्ण जगभरात असतात मग आपल्या सर्वात जवळ जो पण सर्वर असतो त्याच्याकडे या माहितीची ब्राऊजरद्वारे मागणी केली जाते. 

नंतर रूट सर्वर पर्यंत पोहोचल्यावर मग ही विनंती टॉप लेवल डोमेन कडे जाते. या सर्वरकडे सेकंड लेवल डोमेन ची माहिती असते. आपल्या उदाहरणात हे alaukikmarathi असं आहे. मग नंतर ही विनंती डोमेन सर्वरकडे जाते. जो मग ब्राऊजरला आयपी अॅड्रेस देतो आणि मग ती वेबसाइट ब्राऊजरमध्ये दिसते. हे सर्व काही मिली सेकंदात होत असतं. फक्त इंटरनेट जरा फास्ट असलं पाहिजे. 

चार सर्वर 

जेव्हा पण तुम्ही एखाद्या वेबसाइटची लिंक ब्राऊजरमध्ये टाइप करता तेव्हा ही वेबसाइट आपल्याला दाखवण्यासाठी एकूण चार सर्वर आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. यांची नावे अशी आहेत. recursive resolvers, रूट नेम सर्वर, टॉप लेवल डोमेन नेमसर्वर, authoritative नेमसर्वर 

DNS recursor 

हा DNS recursor पहिलं स्टेशन आहे. हा आपल्या डिवाइसच्या आणि DNS नेमसर्वरच्या मध्ये असतो. हा एक तर आधी सांगितल्याप्रमाणे ब्राऊजर किंवा डिवाइस चा कॅशे तपासतो जर तिथे माहिती असेल तर तिथूनच सर्व माहिती मिळवून आपल्याला वेबसाइट दाखवतो किंवा वरील सर्व प्रक्रिया करतो. 

रूट नेमसर्वर 

हा रूट नेमसर्वर आपल्याला समजेल अशा भाषेतून वेबसाइटच्या नावांना आयपी अॅड्रेस मध्ये रूपांतरित करतो. याच्याकडे कोणती वेबसाइट कोणत्या सर्वरवर आहे याची माहिती असते. मग हा आपली विनंती त्या सर्वरवर पाठवतो. जरा सरकारी कामांसारखंच दिसायलंय, या टेबलवरून त्या टेबलवर पण हे काही सेकंदाच्या आतच होत असतं. हा सर्वर मग टॉप लेवल डोमेन सर्वर ची यादी देतो. मग आपला डिवाइस योग्य त्या टॉप लेवल डोमेन सर्वरकडे जातो.

टॉप लेवल डोमेन सर्वर 

तुम्ही या वेबसाइटवर cyberbandhu.in या अॅड्रेस च्या मदतीने आलात पण जर तुम्ही .in ऐवजी जर .com किंवा .org असे बदल केले तर तुम्ही वेगळ्याच वेबसाइट वर जाताल. अशाच सर्व वेगवेगळ्या वेबसाइटची यादी या टॉप लेवल डोमेन सर्वरकडे असते. 

Authoritative नेमसर्वर

हा authoritative नेमसर्वर सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. याच्याकडे आता आपल्याला हव्या असलेल्या वेबसाइटचा आयपी अॅड्रेस मिळून जातो. 

DNS सर्वर सुरक्षित असतात का?

नाही. जर तुम्ही तुमच्या वायफाय चं किंवा सिमचं इंटरनेट वापरत असाल तर ते तुमच्यासाठी फारसं सुरक्षित नाही. कारण तुमची इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी सहजपणे तुम्ही कोणत्या वेबसाइटवर जाताय हे सर्व पाहू शकते. शिवाय असंही सांगितलं जातं की त्यांचे DNS सर्वर फारसे सुरक्षित नसतात. जर ते हॅक झाले तर हॅकर त्याच्या मनाप्रमाणे त्याला हव्या असलेल्या सर्वरवर आपल्याला रेडिरेक्ट करू शकतो. 

DNS vs VPN 

जे चांगले व्हीपीएन असतात ते स्वतःचे DNS सर्वर वापरत असतात. जे की फास्ट आणि सुरक्षित असतात. शिवाय ते DNS सर्वर एंक्रीप्टेड असतात म्हणजे तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधून तुम्ही कोणतीही विनंती त्यांच्या सर्वरला पाठवली तरी ती कंपनी काहीच पाहू शकणार नाही. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीचा व्हीपीएन वापरा. खास करून विकत घेतलेले चांगले राहतील. 

DNS चे फायदे

हे सर्वर वापरण्याचे खूप फायदे आहेत. तुम्ही जर तुमच्या इंटरनेट पुरवणाऱ्या कंपनीचा डोमेन नेम सिस्टम सर्वर वापरत असाल तर त्या तुम्हाला कसलीच सुरक्षा प्रदान करत नाहीत. तुम्ही कदाचित एखाद्या malicious वेबसाइटवर जरी गेलात तरी ते तुम्हाला अडवणार नाहीत. काही फायदे खाली मी दिले आहेत. 

मॅलीशियस आणि फिशिंग वेबसाइटपासून सुरक्षा

एक चांगला सर्वर तुम्हाला फिशिंग आणि मॅलीशियस वेबसाइटपासून वाचवतो. हे सर्वर तुम्हाला त्या वेबसाइटवर जायच्या आधीच ब्लॉक करतं. जर तुम्ही चुकून कोणत्याही लिंकवर क्लिक केलं तरी घाबरायची गरज नाही. त्यांच्याकडे जर त्या वेबसाइटची माहिती असेल तर ते लगेच ब्लॉक करतील. 

फाइललेस मॅलवेअर -सायबर बंधू

चुकीची टाइपिंग 

असं कित्येकदा होत असेल की तुम्ही गडबडीत चुकीचं टाइप केलं तर तुम्ही दुसऱ्याच वेबसाइटवर जाल पण ती वेबसाइट कदाचित हॅकरची असू शकते. त्यामुळे अशा चुकांपासून पण हे सर्वर तुम्हाला बहुतांश वेळा वाचवू शकतात. 

जलद आणि सुरक्षित 

सिम आणि वायफाय कंपन्यांपेक्षा तर हे जास्त सुरक्षित तर आहेतच शिवाय हे फास्ट पण असतात. त्यामुळे यांचा वापर करणं फायद्याचं ठरेल. 

अनब्लॉक 

blocked svg icon

काही वेबसाइटवर आपल्या देशात बंदी घालण्यात आली आहे. जर तुम्हाला त्या वापरायच्या असतील तर तुम्ही एखादी डोमेन नेम सिस्टम सर्वरची सेवा खरेदी करून त्यात बदल करू शकता आणि मग पाहिजे ती वेबसाइट ब्लॉक आणि अनब्लॉक करू शकता. जर तुम्ही पब्लिक डोमेन नेम सिस्टम सर्वर वापरत असाल जसं cloudflare किंवा गूगल पब्लिक DNS तर त्यात तुम्ही बदल करू शकत नाहीत. त्यांनी ज्या वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत त्याच ब्लॉक होतील. जसं जर cloudflare ने भारतात टिक टॉक ब्लॉक केलं नसेल तर याच्या डोमेन नेम सिस्टम च्या मदतीने तुम्ही ती वेबसाइट वापरू शकता. 

DNS चे तोटे 

तसं तर खाजगी कंपन्याचे सर्वर सुरक्षित असतात पण तुम्ही ते वापरत नसाल तर तुमच्यावर कदाचित अनेकदा काही सायबर हल्ले झाले असतील तुमच्या नकळत. या सर्वर वर पण सायबर हल्ले होत असतात. 

Poisoning 

जर तुमचा डिवाइस किंवा ब्राऊजर हॅक झाला असेल तर हॅकर तुमच्या DNS कॅशे सोबत छेडछाड करू शकतो. यात तो वेबसाइटचे आयपी अॅड्रेस बदलून स्वतःच्या वेबसाइटचे आयपी अॅड्रेस टाकू शकतो अशाने तुम्ही मॅलीशियस वेबसाइटला बळी पडू शकता. 

हायजॅकिंग 

यात हॅकर एक तर सर्वरवर ताबा मिळवतो किंवा तुमच्या सेटिंगमध्ये छेडछाड करतो. आणि मग तुम्हाला मॅलिशियस वेबसाइटवर रेडिरेक्ट करतो. 

DNS over HTTPS म्हणजे काय?

ही एक सुरक्षा पद्धत आहे ज्यात आपल्या queries या https प्रोटोकॉल च्या मदतीने एंक्रीप्ट केल्या जातात. जेणेकरून कुणीही आपल्या queries सोबत कसलीही छेडछाड करु नये.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जॉइन आणि फॉलो करा

Latest post