पेगासस स्पायवेअर स्कॅम 2024 | Pegasus Spyware Scam

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

पेगासस स्पायवेअर

पेगासस स्पायवेअर च्या नावाने स्कॅम

२२ फेब्रुवारी २०२४ ला मला माझ्या कॉलेजच्या ईमेल आयडी वर एक ईमेल आला. तसं तर तुम्ही सर्वच जन स्पॅम फोल्डर फार कमीच उघडत असाल आणि मी सुद्धा, पण २९ फेब्रुवारीला तो मी उघडला. आणि त्यात मला या स्कॅमरचा ईमेल दिसला. आणि तो मी उघडला. ज्यात त्यानं खालील मजकूर लिहिला होता. जर तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे समजत असेल तर तुम्ही खालील फोटोमधील ईमेल वाचा नाहीतर मी त्याचं मराठीत भाषांतर केलं आहे ते वाचा. पण हा पेगासस स्पायवेअरच्या नावाने स्कॅम कसा आहे ते मी सांगितलं आहे.

भाषांतर

हॅलो मित्रा

मला तुला एक खूप वाईट बातमी द्यायची आहे. पण जर तू चांगलं वागलास माझ्या म्हणण्याप्रमाणे तर तुझ्यासाठी ही सुखाची गोष्ट ठरेल.

पेगाससचं नाव ऐकलंस कधी?

हा एक असा स्पायवेअर प्रोग्राम आहे जो कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये इंस्टॉल केला जातो आणि त्याच्या मदतीने हॅकर तुम्ही ऑनलाइन काय करताय यावर लक्ष ठेवतो. हा तुझ्या कॅमेऱ्याच्या, एसएमएसचा, ईमेल्सचा अॅक्सेस घेऊ शकतो. कॉल रेकॉर्ड करू शकतो इ.

तुला कळलंच असेल की मी काय केलंय?

काही महिन्यांपूर्वी मी तुझ्या सर्व डिवाइसमध्ये हा स्पायवेअर इंस्टॉल केला आहे. याचं कारण तुला याबद्दल जरा पण अक्कल नाही की कोणत्या लिंकवर क्लिक करावं किंवा करू नये.

याचं काळात मला तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल खूप काही माहिती मिळाली आहे. पण त्यापैकी एक गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे.

मी तुझे विडियो रेकॉर्ड केले आहेत जेव्हा तू अश्लील विडियो बघत होतास. त्यापैकी पण तू असे काही प्रकारचे विडियो बघितलास जे तुला अडचणीत टाकू शकतात. यावरून तर मला तू खूप तुंबलेला आहेस असं दिसतंय. आणि मला असं वाटतंय की तू याबद्दल तुझ्या मित्रांना, घरच्यांना आणि सह कामगारांना याबद्दल कळू देणार नाही. आणि हे सगळं मी काही क्लिक्स मध्ये करू शकतो.

तुझ्या मोबईलमधील प्रत्येक नंबरला मी कही क्षणात तुझे विडियो पाठवू शकतो. मग ते टेलेग्राम, व्हॉट्सअॅप, स्काइप आणि ईमेल जिथे पण असतील तिथे त्यांनी हा विडियो मिळेल.

अशाने तुझ्या जीवनात खूप मोठी त्सुनामीच येईल. तुझं आयुष्य उध्वस्त होईल आणि तू तुझ्या मागील काळात कसा होतास याबद्दल लोकं विसरून पण जातील.

तू खूप साधा भोळा आहेस असा अजिबात विचार करू नकोस. कुणालाच माही नाही की तुझातील ही विकृती पुढे जाऊन काय बदल घडवेन. त्यामुळे तुला एका प्रकारे ही एक शिक्षाच आहे असं समज.

उशीर होण्यापेक्षा चांगलंच आहे.

मी एक प्रकारचा देव आहे जो सर्व बघत आहे.

पण घाबरू नकोस. देव दयाळू असतोच आणि मी पण आहे.

पण माझी दया फुकट नाही.

$१७८० अमेरिकन डॉलर माझ्या बिटकॉईन वॉलेट मध्ये पाठव. ही त्याची आयडी : (कॉपी पेस्ट कर नाहीतर चुकीच्या वॉलेट मध्ये जातील) जसे मला ते बिटकॉईन मिळतील मी तुझे सर्व विडियो डिलीट करेन आणि तुझ्या सर्व डिवाइस मधून पेगासस स्पायवेअर पण डिलीट करून टाकेन. हे लक्षात ठेव मला फक्त पैसे पाहिजेत.

नाहीतर तुला काहीही न सांगता मी तुझं आयुष्य उध्वस्त पण करू शकलो असतो.

तू जेव्हा पण हा ईमेल उघडशील मला याबद्दल कळेल आणि उघडल्यापासून तुझ्याकडे फक्त ४८ तासांचा वेळ आहे.

जर तुला cryptocurrency काय आहे हे जर माहीत नसेल तर काळजी करू नको. गूगल वर जा आणि crypto exchange सर्च कर हे amazon वरून काही तरी मागवण्या इतपत सोपं आहे.

खालील चुका तर अजिबात करू नकोस.

  • या ईमेल वर उत्तर देऊ नको मी हा मेल temp मेल वरून पाठवला आहे. ज्याच्या मदतीने माझ्या तपास करणे अशक्य आहे.
  • पोलिसांना पण याबद्दल अजिबात सांगू नकोस. माझ्याकडे तुझ्या डिवाइसचा पूर्ण ताबा आहे. तू जसा पोलिसांकडे जाशील मला याबद्दल कळेल आणि दुसऱ्याच क्षणाला तुझे सर्व विडियो प्रसारित केले जातील.
  • तुझे डिवाइस रिसेट आणि नष्ट करण्याचा पण प्रयत्न करू नकोस.

जसं की मी आधीच सांगितलंय – मी तुझ्या सर्व कृतींवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे एक तर माझ्या अटी मान्य कर किंवा तुझे विडियो प्रसारित केले जातील.

आणि हे विसरू नकोस की cryptocurrency ला पण ट्रॅक केलं जाऊ शकत नाही त्यामुळे मी दिलेल्या आयडी ने पण मला ट्रॅक करणं अशक्य आहे.

माझ्या शुभेच्छा तुला आहेत विकृत मित्रा. आणि आशा करतो की हा आपला शेवटचा संवाद असेल.

आणि माझ्याकडून एक सल्ला : इथून पुढे कोणत्याही लिंकवर क्लिक करताना विचार करूनच क्लिक कर.

मी काय केलं?

मला पेगासस स्पायवेअर बद्दल थोडीच माहिती होती. ती अशी हा एखाद्याच्या नकळत त्याच्या फोनमध्ये इंस्टॉल केला जाऊ शकतो. पण मी शंका दूर करण्यासाठी जेव्हा सर्च केलं तेव्हा कळलं की हा अँड्रॉईडमध्ये पण इंस्टॉल केला जाऊ शकतो मग जरा भीती वाटली पण याबद्दल अजून माहिती मिळवली ज्यात कळलं की हा स्पायवेअर असा कुणालाही मिळत नाही.

ज्या कंपनीने याला बनवलंय ती इस्रायलची संस्था आहे जी हा स्पायवेअर फक्त इतर देशांच्या सरकारलाच विकते. आणि हा स्पायवेअर खूप महाग पण आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार याची किंमत $६५०,०००= ₹५,३८,८४,७४० आहे आणि याला एखाद्याच्या फोनमध्ये सेटअप करण्यासाठी $५००,०००= ₹४,१४,४९,८००  एवढं शुल्क आहे.

यावरून तुम्ही पण एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की एवढा पैसा खर्च करून तो माझ्याकडून फक्त $१७८० म्हणजे १,४७,५६१ रुपये मागत होता. यावरून मला कळलं की हा खोटा ईमेल आहे आणि त्यानं फक्त मला फसवण्यासाठी हा ईमेल पाठवला होता.

त्याला माझा ईमेल कसा मिळाला?

२०२२ च्या आधी मी खूप निष्काळजी होतो. कसलाही विचार करायचो आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करायचो त्यामुळेच माझं ब्राऊजर एकदा हायजॅक पण झालं असेल. नंतर एका टूलच्या मदतीने मला कळलं की Russian Password stealer मुळे माझा ईमेल आणि पासवर्ड लीक झाला होता. याच्या मदतीनेच नंतर कदाचित माहिती डार्क वेबवर उपलब्ध झाली असावी ज्यात माझी कॉलेजची पण ईमेल आयडी लीक झाली असावी.

एवढा महागडा स्पायवेअर असून पण त्याने मला हा ईमेल का पाठवला?

याने हाच ईमेल जशास तसा खूप लोकांना पाठवला असेल. हा ईमेल पण तुम्ही जर वाचला तर त्यात माझं नाव नाही. त्याने pervert हा शब्द वापरला आहे. अशी कुठलीच माहिती त्याने यात लिहिली नाही की ज्याने माझी ओळख पटेल. यात त्याने व्हॉट्सअॅप, टेलेग्राम सोबत स्काइप चं नाव पण जोडलं आहे.

जे मी तर वापरतच नाही पण माझ्या अख्ख्या खानदानात पण कुणी वापरलं नाही आणि मित्र पण वापरत नाहीत. मग काय झालं असा विचार करत असाल? तर सांगतो या पेगासस स्पायवेअरकडे आपली सगळी माहिती जाते त्यामुळे जर त्याने खरंच हा माझ्या मोबाईलमध्ये इंस्टॉल केला असता तर याचं नाव नमूद केलं नसतं.

शिवाय माझ्याबद्दल पण किंवा माझ्या फोनबद्दल पण कसलीही अशी माहिती या ईमेलमध्ये नव्हती ज्याने मला खात्री पटेल की माझ्या मोबाईलमध्ये खरंच असा काही स्पायवेअर आहे.

त्याने हा ईमेल असा काही तयार केला आहे ज्याने तो कोणावरही काम करू शकतो. जर त्या समोरच्या व्यक्तीने विचार न करता घाबरला तर तो त्याला पैसे पण देण्यास तयार झाला असेल. आणि कदाचित कित्येक जणांनी याला पैसे पण दिले असतील.

मला फक्त हिच भीती होती जर यानं खरंच हा इंस्टॉल केला असेल तर हा कदाचित माझ्या खात्यातून पैसे पण काढून घेऊ शकला असता. बाकी याला तर मी काहीच दिलं नसतं (द्यायला काही नव्हते पण). आता ४८ तास उलटून गेलेत आणि कुणालाच कसलाही विडियो गेला नाही आणि मला पण आता कसलाच ईमेल आलेला नाहीये यानंतरच मी ही पोस्ट लिहिल आहे.

बर तुम्हाला आता हे तर कळलं असेल की तुमच्यावर कुणीच जवळपास १० कोटी तर उगाच खर्च करणार नाही. पण जर तुम्ही बेसावध असाल तर तुमच्या इतर स्पायवेअर,  रॅंसमवेअर सारखे हल्ले नक्कीच होऊ शकतात. यांच्यापासून वाचायचं याबद्दल माहिती तुम्हाला या वेबसाइटवरील आधीच्या पोस्टमध्ये तर नक्कीच मिळतील आणि इथून पुढे पण मिळत राहतील. त्यामुळे वेबसाइटला नक्की भेट देत रहा. आणि जर तुमच्यासोबत पण असा काही सायबर गुन्हा झाला असेल तर मला नक्की कळवा याने इतर लोकांचे पण पैसे वाचतील.

पेगासस स्पायवेअर कुणी बनवला?

इस्रायलच्या NSO संस्थेने हा स्पायवेअर बनवला आहे.

पेगासस स्पायवेअरची किंमत किती आहे?

याला विकत घेणे आणि एखाद्याच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करण्यासाठी किमान १० कोटी रुपये खर्च येतो.

पेगासस कोणत्या भाषेत लिहिलेला आहे?

हा स्पायवेअर पायथन आणि जॅंगो या भाषेत लिहिला आहे.

पेगासस स्पायवेअर तुमच्या फोनवर आहे हे तुम्हाला कसे कळेल?

यासाठी तुम्ही mobile verification tool चा वापर करू शकता.

पेगासस स्पायवेअरचा हल्ला कुणावर होतो?

याचा उपयोग दहशतवादी, राजकारणी, पत्रकार आणि कार्यकर्ते यांच्यावर होतो.

पेगासस अजूनही काम करतो का?

हो सध्या २०२४ मध्ये तो अजूनही काम करतो. त्याच्यावर कोणतीच बंदी घातलेली नाहीये.

पेगासस कसे कार्य करते?

फक्त एक कॉल करून हा फोनमध्ये इंस्टॉल केला जाऊ शकतो.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *